-श्याम गांवकर
जीवनात यशप्राप्त करणे ही प्रत्येक माणसाच्या मनातील मनीषा. जीवनाच्या प्रत्येक वळणावरून पुढे जात असताना मनात स्वताच्या सामर्थ्यावर विश्वास ठेऊन जगाला गवसणी घालण्याची मनीषा बाळगणारे जीवनात यशस्वी होतात. वास्तविक यश म्हणजे काय याची व्याख्या करता येत नाही पण स्वताच्या क्षमतेनुसार स्वताला जे हवं ते मिळवता येणं म्हणजे यश असं मानलं जातं.
यशवंताच्या ह्या चौकटीत समविष्ठ होणारे माझे वरिष्ठ सहकारी श्री. जॉन आगियार यांचे नाव अग्रक्रमांकाने घेण्याचा मोह मला टाळता येत नाही. अष्टपैलु व्यक्तीमत्वाचा सार मला या व्यक्तीमत्वामध्ये दिसतो. एक सुशील अधिकारी, लेखनाच्या प्रतिभेतून साहित्य विश्वावर आदिपत्य गाजवणारा लेखक, कवी, पत्रकारितेच्या क्षेत्रात दैदिप्यमान प्रतिभा असलेला पत्रकार अशा विविधांगी भुमिका साकारणारा निगर्वी व सालस व्यक्तीमत्व जे ४ जून रोजी आपली साठी साजरी करत आहे.
समाजातील अडलेल्या नडलेल्यांना मदत करण्यात अग्रेसर असणारे हे व्यक्तीमत्व सर्वसामान्यावर झालेला अन्याय दूर करण्यात मदत अग्रेसर असणारे व्यक्तीमत्व म्हणून माहिती आणि प्रसिध्दी खात्यात त्यांची ओळख. कधीही त्याच्याकडे गेलो की हसतमुखाने चेष्टा मस्करीने येणा-यांचे स्वागत करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी जाणा-या माणसाचे दुःख आपसुकच कमी होते व जॉन समोरच्या माणसाला आपला माणूस असल्यासारखे वाटायला लागते.
समाजात वावरत असताना प्रत्येकाने आवश्यक असणा-या बदलांची सुरवात स्वतापासून करावी आणि आपल्याला वाटणारे परिवर्तन आपण स्वता घडवावं असं श्री. आगियार यांच मत, ज्या ज्यावेळी त्यांच्याकडे दैनदिन कामाची एकादी फाईल घेऊन गेलो की ते म्हणायचे सुरवात कर, हवी तेथे मदत मी करेन, याचाच अर्थ असा होतो की माणसाच्या आयुष्यात बाहेरचं कुणीतरी येऊन काहीतरी बदल घडवेल अशी अपेक्षाच बाळगणे मुळात गैर असते, असा तो अप्रत्यक्ष पणे प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
कितीही जटीला समस्या त्यांच्याकडे घेऊन गेलो की ती चुटकी सरशी सुटत नसते हे माहित असल्याने काही वेळ घेऊन त्यावर साधन-बाधक चर्चा करून सोडविण्याची हुशारी आणि त्यासाठी लागणारे कसब त्याच्याकडे नक्कीच आहे. कारण जॉनकडे संयमाचा खजिनाच आहे.
श्री. जॉन आगियार म्हणजे विविध रूपांचा मसिहा समाजात आपल्याला विविध प्रकारची माणसं मिळतात. पैकी काहीजण खाजगी जीवनात मिळालेल्या यशामुळे हुरळून जातात. कारण त्यांनी यश मिळविण्यासाठी आणि ते पचविण्यासाठी लागणारी तपश्चर्याच केलेली नसते. यश मिळालं सर्वकाही मिळालं, अशी काही लोकांची धारणा असते. जॉन मात्र अशा गोष्टीना अपवाद ठरतो. सर्व सामान्यात वावरताना त्यांचा निरागसपणा साक्ष देतो. साधी राहाणी आणि उच्च विचारांची सांगड घालून जीवन व्यथीत करणारा जॉन आगियार सर्वसामान्याना हवाहवासा वाटतो कारण त्याच्यात ‘मी’पणा कधिच दिसला नाही.
जीवनातील तीन टप्पे साकारत असताना जॉन आगियार यांनी अनेक संकष्टांनाही तोंड दिले. गरिबीतून वर आलेला जॉन म्हणजे जिद्द, चिकाटी आणि यश यांचे मूर्तीमंत उदाहरण आहे. लहानपणात विविध समस्यांना तोंड देत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्याच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली. कॉलेज जीवनात अंगात असलेल्या कल्पक कलागुणांमूळे जॉन कॉलेज जीवनात बराच बहरला. विविध स्पर्धातून त्यांनी आपल्या अंगात असलेल्या कलागुणांच्या छापेमूळे जनमानसात आपले नाव केले. वेळोवेळी मिळालेल्या प्रोत्साहानामुळे तो अधिकच बहरत गेला या सर्वाची परिणीती म्हणजे आजचे त्याचे अष्टपैलू व्यक्तीमत्व समोर दिसते.
गोवा शासनाच्या माहिती आणि प्रसिध्दी खात्यात माहिती सहाय्यक ते माहिती अधिकारी पदांवर काम करत असताना त्यांनी विविध महत्वाच्या जबाबदा-या पार पाडल्यात. खात्यातील कामाव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबध्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. होमगार्ड विभागात स्वेच्छेने काम करत असताना त्यानी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना २००७ मध्ये मुख्यमंत्री स्वर्णपदक प्राप्त झाले. २०१२ मध्ये दर्जेदार सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले व २०२० मध्ये परत एकदा त्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली आहे. याशिवाय इतर अनेक छोट्यामोठ्या पुरस्कारांनी त्यांनी राज्य तसेच राज्याबाहेर सन्मानित करण्यात आले आहे.
श्री. जॉन आगियार यांनी आपल्या जीवनात माहिती खात्यात काम करत असतानाच इतर क्षेत्रातही डेप्युटेशन पध्दतीने काम केलेले आहे. १९९० मध्ये त्यांनी तत्कालीन केंद्रीय विदेश मंत्री श्री. एदुआर्द फालेरो यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले आहे. गोवा पोलीस खात्याचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी १३/०६/२०११ ते ०८/१२/२०१७ या काळात काम पाहिले आहे. गृहरक्षक दलाचे कंपनी कमांडर म्हणून त्यांनी २००२ ते जून २०२० या काळात काम केले आहे. शिवाय अनेक शिबिरांमध्ये त्यांनी सहभाग घेऊन आपली चुणूक दाखवलेली आहे.
साहित्य क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्याची कसब त्यांच्या लेखणीतून दिसते. त्यांचा पावला हा कोंकणी काव्याचे पुस्तक १९९६ साली प्रसिध्द झाले. त्यानंतर सांज, गुलमोहर, वल्यो यादी ही कोकणी पुस्तके प्रसिध्द झाली. ऑफ साईड हे इंग्रजी निबंधाचे पुस्तक त्यांनी लिहून प्रसिध्द केले आहे व मांडविच्या देगेवेल्यान हे रोमन कोकणीमध्ये निबंधाचे पुस्तक त्यांच्या नावावर आहे. त्यांनी लिहिलेल्या वल्यो यादी या कविता संग्रहाला कोंकणी भाषा मंडळाचा साहित्य पुरस्कारही प्राप्त झालेला आहे.
श्री. जॉन आगियार यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्याचा गोव्यातील नामांकीत पत्रकार संघटनानी सत्कार व गौरव केलेला आहे. यामध्ये २००६ मध्ये फोंडा पत्रकार संघटना, २००९ मध्ये सावर्डे-केपे पत्राकर संघटना, अंत्रूज शिगमोत्सव समिती, २००५ दक्षिण गोवा पत्रकार संघटना आणि २०१८ साली अखिल गोमंतक नाभिक समाजातर्फे त्यंना गौरविण्यात आलेले आहे. २००९ मध्ये सांगे-केपे पत्रकार संघातर्फे पत्रकारमित्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे.
पत्रकारीतेत त्यांनी गोंयचो आवाज या मासिकामधून लिहीण्याला सुरवात केली तद्नंतर दैनिक हेराल्ड या इंग्रजी दैनिकासाठी वार्ताहर म्हणून काम केले. गोमंतक या वर्तमान पत्रासाठी त्यांनी फोंडा प्रतिनिधी म्हणून काम पाहिलेले आहे. याशिवाय वेस्ट कोस्ट टाईम्स व गुलाब मासिकासाठी कॉलम रायटर म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.
पदवी शिक्षणानंतर श्री. जॉन आगियार यांनी पुणे टिळक विध्यापिठातून पत्रकारीतेत पदवी संपादन केली व एका वर्षानंतर पत्रकारीता विषय घेऊन मास्टर डिग्री घेतली. त्यांच्यामते शिक्षण म्हणजेच सर्वकाही असते असे नाही तो नेहमी म्हणतो अनुभवातून माणूस खूप काही शिकत असतो. त्यांच्या मते एखादा जटील प्रश्न चुटकीसरशी सुटत नसतो तर तो सोडविण्यासाठी माणुस हुशार असावा लागतो. माणसाकडे संयम असायला हवा. कदाचित एखादा प्रश्न सोडवताना सभोवतालचे सगळेच खूश होणारे असतात असे नाही, मात्र त्यांचे समाधान होणे गरजेचे असते. हा कित्ता प्रत्येकाने जीवनात गिरवायला हवा असे त्याचे प्रांजळ मत.
जीवनात प्रत्येकासमोर अडचणीचे अनंत डोंगर असतात अशावेळी माणसांनी धीर सोडायचा नसतो तर मार्ग काढायचा असतो या पर्यायाची शिकवण श्री. जॉन आगियार यांच्याकडून मी शिकलेलो आहे. शिवाय जे द्यायचे ते हृद्यातून द्यावे आणि जे मौनातून व्यक्त होतं, ते तितकं प्रभावीपणे कधी शब्दांमधून व्यक्त करता येत नाही, ही श्री. जॉन आगियार यांची खास जीवनप्रणाली होय, त्यांना साठीच्या खुप शुभेच्छा.
No comments:
Post a Comment