- दुर्गाकुमार श्रीकृष्ण नावती
-
गोव्याच्या माहिती आणि प्रसिध्दी खात्यातील अधिकारी जॉन आगियार हे चतुरस्व व्यक्तिमत्व हसतमुख, मिश्किल स्वभाव त्यामुळे त्यांनी सबंध गोव्यात अनेक माणसे जोडलेली आहेत. या ना त्या कारणाने नेहमीच प्रकाशझोतात असणा-या सुदैवी माणसापैकी ते एक. त्यामागे त्यांचे कष्ट, मेहनत तर आहेच परंतु सर्वसामान्यामध्ये मिसळण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करून दाखविण्याकडे त्यांचा कल. राजपत्रित अधिकारी असून देखील आपल्या हुध्यापेक्षा, मैत्री श्रेष्ठ मानणा-यापैक्षा ते आहेत. थोडक्यात सामाजिक जाणीव असलेल्या अवघ्याच सरकारी अधिका-यांमध्ये जॉन आगियार यांची गणना होते.
जॉनची आई सारस्वत, तर वडिल कॅथलिक परंतु येशू ख्रिस्त आणि माता शांतादुर्गा या दोन्ही दैवतांची सेवा ते तेवढ्याच श्रध्देने करतात. त्यांच्या घरात सगळे हिंदू समाजातील सण साजरे होतात. ख्रिसमसही तेवढ्याच उत्साहाने साजरा होतो. लादीनच्या आयोजनामध्ये पुढाकार घेणारे जॉन, कॉलनीमधील सत्यनारायण महापूजाचेही यजमानपद तेवढ्याच हौसेने स्वीकारतात. आपण मानव धर्माला प्राधान्य देतो, देव देवतावरही आपला खूप विश्वास असल्याचे ते सांगतात. धर्म, धर्माच्या ठिकाणी मोठा असतो कारण प्रत्येक घर्म माणुसकी आणि कर्तव्याची शिकवण देतो हे त्यांचे “तत्वज्ञान” आपली पत्नी आणि सूनही हिंदूच आहे परंतु त्यामुळे आपल्या कुटुंबात कसल्याही प्रकारची तेढ कधीच निर्माण झाली नाही. उलट त्यामुळे घरच्या वातावरणातील आनंदाची व्याप्ती झाल्याची अनुभूती आपण घेत असल्याचे जॉन सांगतात.
स्पष्ट, सरळ आणि मृदू बोलणारे जॉन हे कोकणी कवी आहेत. त्याचे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्याशिवाय इंग्रजी आणि कोकणी रोमन लीपीतून निबंधाचे पुस्तकही प्रसिध्द झाले आहे. आकाशवाणीवरून त्यांच्या गीतरचना प्रसारित होतात. नामांकित गायकांनी त्यांची गीते गायिलेली आहेत. वर्तमानपत्रातून विविध विषयांवरील त्यांचे लिखाणही अधूनमधून प्रसिध्द होत असते. जॉन मुळात पत्रकार. एका इंग्रजी दैनिकामधून त्यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. पुढे भविष्य आणि चरितार्थाचे वेगवेगळे आव्हानात्मक मार्ग त्यांनी चोखाळले. श्री. एदुआर्द फालेरो यांच्या विदेश व्यवहार विभागाच्या कार्यालयात निजी सचिव म्हणून त्यांनी सेवा दिली आहे. त्यावेळी गोवा राज्याच्या विकासा संदर्भातील अनेक योजना मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील होते. पत्रकारितेतील आपल्या ओळखी आणि अनुभव याचा फायदा त्याना विकासात्मक कामाच्या आखणीत झाला.
गोव्याच्या हितसंबंधाशी जोडलेल्या बाबी सुरळीत आणि नीटनेटकेपणाने पार पडल्या जाव्यात. तत्कालीन मंत्री एदुआर्द फालेरो यांनीही जॉनकडे महत्वाची जबाबदारी सोपविली होती. सविताशी त्यांचा विवाह झाल्यानंतर गोवा आणि दिल्ली हा व्याप त्यांना जमेनासा झाला. परिणामी १९९१ साली त्यांनी माहिती साहाय्यक म्हणून नोकरी स्वीकारली. पुढे ते सरकारी नोकरीतच स्थिर राहिले. त्यांच्या पत्नी सौ, सविता आगियार याही सरकारी राजपत्रित अधिकारी आहेत.
जॉन “करारी” वृत्तीचे आहेत. हातात घेतलेले काम, मग कितीही अडथळे येओत, ते पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड असते. कुठल्याही स्तरावर जाऊन ते काम करण्याची त्यांची तयारी असते. मडगावच्या चौगुले कॉलेजमधून त्यांनी कला विषयामधील पदवी संपादन केली. पार्वतीभाई चौगुले कॉलेजचा कुशल, अष्टपैलू विध्यार्थी म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते. कॉलेजमध्ये असताना सगळ्या विध्यार्थ्याची फौज जॉनच्य़ा मागे पुढे असायची आणि विशेष म्हणचे आजही या विध्यार्थी मित्रांशी ते मनाने जोडलेले आहेत. विदेशामध्ये असलेले त्यांचे गुरूवंधूही अधुनमधून फोन करून जॉनची विचारपूस करतात. नेमका हाच गुण जॉनला सरकारी नोकरीमध्येही उपयुक्त ठरला.
गुलाब या कोकणी मासिकाचा २०११ सालाचा प्रसिष्ठेचा उत्तम लेखक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता, लेखन आणि वक्तृत्व हा त्यांचा आवडीचा विषय. लिखाण आणि बोलण्याची विशिष्ट शैली त्यांनी विकसित केल्याचे जाणवते. उत्कृष्ट छात्र म्हणून एन.सी.सी. मध्ये त्यांनी लौकिक मिळविला. नेमबाजी हा त्यांचा छंद. नेमबाजीमध्येही त्यांनी आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. गोवा पोलीस खात्याच्या होमगार्ड ॲण्ड सिव्हिल डिफेन्स विभागात बरीच वर्षे जॉननी कंपनी कमांडर म्हणून स्वेच्छा काम केले. आपल्या अधिकारपदाच्या कार्यकाळात होमगार्ड विभागात काम करणा-या गृहरक्षकांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यांच्या व्यथा वरिष्ठ अधिका-यांना कळवून त्यांच्यासाठी सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्यही केले.
होमगार्डमधील उत्कृष्ठ सेवेसाठी मुख्यमंत्री सुवर्णपदक व राष्ट्रपती सन्मानपदक त्यांना प्राप्त आहे. आपले नेतृत्वगुण व क्षमता सिध्द करण्याच्या मिळालेल्या संधीचे त्यांनी यथोचित सार्थक केले. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिका-यांकडून कौतुकाची थाप मिळविणारे जॉन आगियार हे प्रचंड ताकदीचे रसायन असल्याची वरिष्ठ पोलीस अधिका-यांची खात्री झाली. परिणामी पोलीस महानिरीक्षक मॅडम सुंदरी नंदा पोलीस खात्याचे संपर्क अधिकारी म्हणून त्यांची अधिकृत नियुक्ती केली. या काळात पत्रकार आणि पोलीस खाते यामधील समन्वय अवाधित ठेवण्यात व संबंध वाढविण्यात ते यशस्वी झाले. मुळात पत्रकार व माहिती अधिकारी म्हणून स्वतःकडे असलेला अनुभव उपयोग पडला.
जॉनचा जनसंपर्क दाडगा आहे सामाजिक बांधिलकीची जाण त्यांना आहे. आपल्या ओळखीचा वापर कुणाच्या तरी भल्यासाठी होत असेल तर तो करण्याची तयारी असते, तत्पर असे ते अधिकारी आहेत. अन्यायाची चीड असलेल्या या अधिका-याला अर्थातच अपमान उपहासही नवीन नाहीत परंतु चांगुलपणावर त्यांचा विश्वास आहे. दुस-याला समजून घेतले पाहिजे, चूक सुधारण्याची संधी त्याला दिली पाहिजे आणि तरीही सुधारण्याची चिन्हे एखादा दाखवता नसेल तरच त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, अशा सकारात्मक विचारांचा हा अधिकारी सहनशील म्हणून ओळखला जातो.
माहिती आणि प्रसिध्दी अधिकारी हा सरकार आणि समाज यामधील दुवा असतो. शासनाकडून होणारा विकास आणि योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे शासनाकडून वेळोवळी येणा-या सूचना, संदेश आणि महत्वाच्या वार्ता गोमंतकीयांना ज्ञात करण्याच्या जबाबदारीबरोबरच सरकार आणि जनतेमधील नाते दृढ करण्याचे आपले कर्तव्य ते खूप निष्ठेने पार पाडतात. त्यासाठी शासनाकडून त्यांची प्रशंसाही झालेली आहे. अलीकडेच संगीतकार मुकेश घाटवळ, सिध्दनाथ बुयांव यांच्या ध्वनी तबकड्यामध्ये (सीडी) त्यांनी रचलेल्या गीताचा समावेश आहे. गोव्यातील नामवंत गायकांनी त्यांची ही गीते गायिली आहेत. गिर्यारोहणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांनी उत्तम गिर्यारोहक म्हणून आपली कुवत आणि क्षमता दाखविलेली आहे. चेन्नई येथील मावळणकर राष्ट्रीय नेमबाजी वस्तादपणाच्या स्पर्धेतही सहभागी होऊन जॉनननी आपल्या कौशल्याचा ठसा उमटविला आहे.
सरकारी नोकरी हा जनतेचा सेवक असतो. जनतेचा विश्वास संपादन करायचा असेल तर एक पाऊल पुढे टाकण्याची जबाबदारी सरकारी नोकरीने अंगीकारली पाहिजे. जनतेच्या निरपेक्ष सेवेमध्ये मिळणारा आनंद सुखदायी असतो. जनता आणि सरकार यामधील नाते दृढ करण्याचे काम जेवढे सरकारी कर्मचारी करू शकतात तेवढे ते कुणीही करू शकणार नाही असे मानणारा जॉन आगियार हा सरकारचा एक आदर्श अधिकारी आहे. सरकारी कर्मचारी व लोकामध्ये सख्य हवे, असे आग्रही मत त्यांनी व्यक्त केले.
ह्या जून महिन्यात ते सरकारी कामातून सेवानिवृत्त होत आहे. आज जून ४ रोजी त्याच्या ६० व्या वाढदिवशी माझ्या त्याना सुभेच्छा.
No comments:
Post a Comment